अगदी थोड्या
अनिरुद्ध बनहट्टी

अगदी थोड्या कातळात
संपली माझी नक्षी
उरलेल्या दगडाचा
उडाला आभाळात पक्षी

flight of the moonstone

अगदी थोड्या शब्दात
संपली माझी पहाट
आणि मग उरले
गाडग्यांचेच रहाट

अगदी थोड्या थेंबात
जन्मली जाम पिलावळ
पक्वान्नांचे सण संपले
घराची झाली खानावळ

अगदी थोडा पाऊस
जमीन तडकलेली
नुसतेच गाभण ढग
सावली भडकलेली

अगदी थोडा सुगंध
बाकी घाणेरीची फुले
चाफ्याच्या झाडाखाली
हगायला बसली मुले

अगदी थोड्या जहाजांची
क्षितिजापल्याड धाव
पैलतीरी जायला
मृत्यूचा साधा पडाव

अगदी थोड्या स्पर्शातच
तिचे कौमार्य छेदले
खरे तर बलात्काराच
पण कपाळी कुंकू गोंदले

अगदी थोड्या पैशासाठी
आयुष्य टाकले गहाण
चंदनच कठीण होते
झिजून गेली सहाण

अगदी थोडे उरले आता
सतारीचे दिड दा दिड दा
चारदा आत्महत्या केली
अजून का पडेना पडदा?

अगदी थोडी आतषबाजी
संपली माझी दिवाळी
अवसेला रिकामे आकाश
रात्र मखमली काळी

आता पुरे झाले
अगदी थोडे अगदी थोडे
घोडी चढली वरती
शिंगरू व्यायले घोडे

अगदी थोड्या कवितांना
प्रवाह झाला मोकळा
दरवेळी कोण फोडणार
शुक्राचार्याचा डोळा?

अगदी थोड्या विजांनी
आकाश लखलखले
बाकी कुंद राखाडी
दडपणानेच मेले

अगदी थोड्या खुणा
ठेवल्यात मी मागे
तरीही त्यातसुद्धा
केवढे गुंतले धागे

अगदी थोडी गाणी
म्हणावी वाटली आपली
शिडकावा संपतो तोच
धरणी पुन्हा तापली

अगदी थोड्या अंकांमध्ये
गणित झाले बंदिस्त
प्रयोगशाळेत सुबक
प्रत्यक्ष अस्ताव्यस्त

अगदी थोडी दारू
चढली मेंदूच्याही वर
काळाचा बोथटला बाण
अवकाश झाले अनावर

अगदी थोड्या कल्पना
कागदावर साकार झाल्या
प्रचंड वांझोटा कचरा
सगळाच छापून आला

अगदी थोडक्याने
चुकली शेवटची गाडी
फलाटी उरलो एकटा
भोवती घनदाट झाडी

सगळे इकडचे तिकडचे
स्वतःचे अगदीच थोडे
बगळे सगळे शहाणे
राजहंस ठरले वेडे

अगदी थोडे रक्त
जमीनीवर सांडले
प्रेतांच्या उतरंडीवर
प्रत्येक साम्राज्य मांडले

अगदी थोडे पूर्णविराम
वाक्याला करतात पूर्ण
अक्षरांची नुसती झाडे
कागदावरती निष्पर्ण

अगदी थोडे मागणे
देवा तू असशील तर
अव्यक्त असो अस्तित्त्व
नाहीसे व्हावे अंबर

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s