ती व तो : १ : ती

अनिरुद्ध बनहट्टी

shutterstock_2292240

तिची पापणी झुकली
सगळा अंधार झाला
फ्लूरोसंट चुंबन
ओठांचा काजवा झाला

दुपार बाहेर होती
आतमध्ये श्रावण
‘घोऽऽ’ अनाहत पाऊस
डावाचे पत्ते बावन

बावन आठवड्यांमध्ये
संपलं एक वर्ष
तरीही नवीन राहिला
तिचा ताजा स्पर्श

दोघेच आम्ही दुनियेत
इव्ह आणि आदम
बाकी अस्तित्व नाही
फक्त आमची सरगम

सूर जुळलेले
सर्व सप्तकांमध्ये
फूल उमलावे जसे
सर्व ऋतुंमध्ये

प्रेम म्हणजे काय
विचारू नका आम्हाला
एकत्र जगण्या शिवाय
फुरसत आहे कुणाला?

ती माझी पारो
पण मी देवदास नाही
आमच्या डोळस प्रेमाला
कुठलाच शाप नाही

तिची वाट कधी
पहावीच लागली नाही
अपोआप आम्ही भेटायचो
ठरवायचो देखील नाही

म्हणून माझ्या कविता
विरह दुःखाला मुकल्या
बकुळ फुलांच्या माळा
सर्व सुगंधी सुकल्या

सरोवराहून खोल
तिचे गहिरे डोळे
बहाणे बनवण्यात पटाईत
पण माझ्यासाठी भोळे

तिचे शारीर सौंदर्य
वेगळे नाही जाणवले
मने एकत्र झाली
शरीर पूर्ण मालवले

आमचे एकत्र येणे
इतके तीव्र असायचे
जणू जीवच जायचा
काही भानच नसायचे

ती आई झाली
की मी व्हायचो मूल
तिच्या वात्सल्याची
मला पडायची भूल

जगानं तिला छळलं
की मी व्हायचो बाप
खांद्यावरचं तिचं मस्तक
थोपटायचो आपोआप

ती आणि मी
एकमेकांसाठी घडवलेले
जीगसॉचे सगळे तुकडे
एकत्र अचूक बसलेले

तरीही नवीन झाला
येणारा प्रत्येक क्षण
स्पर्शाने प्रेमाच्या
फुललेला कण अन कण

ती कधी उन्मत्त वादळ
मी कुशल नावाडी
मी मंद झुळुकेचा सुगंध
ती फुलांची परडी

मी झालो ज्वालामुखी
तर ती हिमवर्षाव शुभ्र
विझून जायची सगळी
भांडणाची पेटती अभ्र

पण त्या भांडणांमध्ये
असली मजा यायची
कारण नंतरची बट्टी
शृंगारात नहायची

एका टिपूर पौर्णिमेला
छतावर तिच्या बरोबर
आम्हा दोघांनाही दिसला देवदूत
अगदी स्पष्ट आणि खरोखर

आम्ही दोघे जन्मलो
एकमेकांसाठीच फक्त
जसे शरीरात वाहते
उष्ण लाल रक्त

देव असो वा नसो
आम्ही दोघे तर आहोत
स्वच्छ गाणारे सूर
मानवतेच्या टाहोत

शेवट नाही याला
राहीन मी लिहीतच
सर्व विश्व भरलंय
या लहानशा वहीतच

अक्षरांची सर्व कॉम्बिनेशन्स
संपून गेली तर
नवीच भाषा बनवेन मी
पण थांबणार नाही माझा स्वर

ती स्त्री मी पुरुष
हा तर एक अपघात
फक्त आत्मे आम्ही
परस्परांच्या हृदयात!

shutterstock_2292240

(आगामी : २ : तो )

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s