पावसाचा पडदा

 

पावसाचा पडदा

अनिरुद्ध बनहट्टी

 

घनदाट कोसळणारा आवाज
अनाहत बधीर कान
पावसाच्या पडद्यामागे
सुन्न झालेले भान

 

ती निघून गेली तेव्हापासून
आकाश वितळून कोसळतंय
डोळ्यातला पाऊस सर्व
आकाशाचा उतरला गर्व

 

समईत जाळणारी वात
विझलेली धूर पांघरून
भर दुपारी असे कसे
आले दाट अंधारून

 

दैवाने असे सततच
माझ्याशी वैर मांडले
आता तर आकाशातून
माझे धोधो रक्त सांडले

आदरांजली

अनिरुद्ध बनहट्टी

शब्द असे उन्मत्त माजले अर्थ कोळुनी प्याले

निरर्थ मग हे भाषांमधले कवितेच्या कामी आले

 

भगवे गर्द माळुनि देखिल विधवा झाली सांज

नभा टेकली विलक्षण रात्र कवटीची वाजे झांज

 

डोळ्याने सुगंध स्पर्शता स्तनास चांदणे रुते

धूसर डोंगर स्पष्ट धुके हे आकाश मात्र रिते

 

हंबरगायी सळसळ गवती डंख विषारि त्रिशूळ

गर्भगृही अंधाराच्या फुटले नागांचे वारूळ

 

वेद पुराणे रुसून बसली कृष्णाचा ऐकून पावा

यशवदेला फुटला पान्हा गायी करिति दुरावा

 

जडावले अंबर काळे झुंबर लोंबती ढगांचे घोस

पाऊसकाळी रक्तसकाळी मदिरेचा झाला सोस

 

कमरेत वाकली पाल ग्रेसफुल चुकचुकला काजवा

हॉस्पिटलाच्या शुभ्रप्रकाशी फुलपाखरांचा थवा

 

राजपुत्र घोड्यावरून चौखुर उधळत गेला

सर्व मुलीही निघून गेल्या गुलाब वाळवण्याला